चांद्रयान – ३ बद्दल विशेष माहिती | Chandrayaan – 3

LMV - 3

गेल्या काही दिवसांपासून चांद्रयान – ३ ची चर्चा सर्वत्र होत आहे. जसजशी १४ जुलै तारीख जवळ येत आहे तसतशी लोकांची चांद्रयान – ३ बद्दल उत्सुकता वाढत आहे. सर्व देशवासीय चांद्रयान – ३ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

इस्रोच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान – ३ मोहिम यशस्वी व्हावी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. 

Source: ISRO

चांद्रयान – ३ चे प्रक्षेपण कधी व कुठे होईल?

चांद्रयान – ३ हे १४ जुलै २०२३ रोजी १४:३५ वाजता श्री हरिकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन स्पेस सेन्टरच्या दुसऱ्या लाँचपॅड वरून हे रॉकेट लाँच केले जाईल.  एल व्ही एम – ३ च्या मदतीने हे यान चंद्रावर पाठविण्यात येईल.

चांद्रयान – ३ चे बजेट किती आहे?

चांद्रयान – ३ मिशनचे बजेट अंदाजे ६१५ कोटी रुपये आहे. चांद्रयान – ३ चे बजेट इतर देशांच्या चंद्र मोहिमांच्या तुलनेत कमी आहे.

चांद्रयान – ३ ची कोणती उद्दिष्टे आहेत?

चांद्रयान – ३ ची मुख्यत्वे तीन उद्दिष्टे आहेत.

१) पहिले उद्दिष्ट चंद्रावर सेफ आणि सॉफ्ट लँडिंग करणे.

२) दुसरे उद्दिष्ट रोव्हरचे सुस्थितीत चांद्रभूमीवर भ्रमण.

३) तिसरे उद्दिष्ट विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग तसेच उपकरणांचा वापर करून तेथील पृष्ठभागावरील उपलब्ध असलेले नैसर्गिक घटकांचे वैज्ञानिक निरीक्षण करणे.

Chandrayaan – 3

Source: ISRO

चांद्रयान – ३ किती दिवसांची मोहीम आहे?

एकूण १४ दिवसांचे हे मिशन आहे. १ चंद्र दिवस (म्हणजेच पृथ्वीवरचे १४ दिवस) इतके लँडरचे  मिशन लाईफ असणार आहे.

चांद्रयान – ३ मोहिमेचे वैशिष्ट्य काय?

चांद्रयान लॅन्डर हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा आहे. या मोहिमेसाठी गोदरेज समूहाच्या गोदरेज एरोस्पेस कंपनीने इस्रोला काही महत्वपूर्ण भाग पुरविले आहेत.

चांद्रयान – ३  मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारी जगातील विशेष मोहीम ठरणार आहे. कारण यापूर्वी बाकी देशांची अंतराळयाने एकतर उत्तर ध्रुव किंवा विषुववृत्ताच्या परिसरात उतरली आहेत.

चंद्राचा उत्तर भाग सूर्यप्रकाशात असतो. मात्र दक्षिण भागात गडद अंधार असतो. दक्षिण ध्रुवावर अंधार असणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे तसेच विवर आढळतात. या खड्ड्यांमध्ये तसेच विवरांमध्ये जिवाश्म नोंदी, पाणी आणि लूज डिपॉझिट्स आढळून येऊ शकतात. या सगळ्यांचा अभ्यास भविष्यात ड्रिलिंग आणि लँडिंग ऑपरेशन्ससाठी संभाव्य स्थाने शोधण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

हि मोहीम इस्रोसाठी महत्वाची आहे कारण यातून भारताच्या पुढील अंतर-ग्रह मोहिमांसाठी लँडिंग करण्याची समजून येईल. चांद्रयान – ३ च्या साहाय्याने चंद्रावर वैज्ञानिक उपकरणे पाठवून त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यात येईल.

योगदान:

या मोहिमेत इस्रोचे संशोधक पी. वीरामुथुवेल यांचे मोठे योगदान आहे. या मिशनमध्ये चांद्रयानाच्या लँडिंगची जबाबदारी रितु कारिधाल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्या ‘रॉकेट वुमन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जातात.

Mission Profile

Source: ISRO

चांद्रयान – ३ चे मार्गक्रमण कसे असेल?

चांद्रयान – ३ च्या मार्गक्रमणाचे १० टप्पे पुढीलप्रमाणेs:

१) पहिल्या टप्प्यात चांद्रयान पृथ्वीच्या विविध कक्षांमधून पुढे जाऊन पृथ्वीभोवती फेऱ्या मारेल.

२) दुसऱ्या टप्प्यात चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण होईल.

३) तिसऱ्या टप्प्यात चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत शिरेल.

४) चौथ्या टप्प्यात चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी अंतरापर्यंत जाईल. चंद्राभोवती फेऱ्या मारेल.

५) पाचव्या टप्प्यामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल आणि लुनार मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होतील.

६) हि डी-बूस्ट फेज असेल.

७) हि प्री-लँडिंग फेज असेल.

८) हा टप्पा महत्वाचा असून या टप्प्यात यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

९) या टप्प्यात लॅन्डर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून काम सुरु करेल. या कालावधीत लॅन्डर व  रोव्हरचा एकमेकांशी संपर्क होत राहील.  

१०) या टप्प्यात प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या १०० किमी कक्षेत पुन्हा परत जाईल.

चांद्रयान – ३ मध्ये कोणती उपकरणे असणार आहेत?

‘एल व्ही एम – ३’ हे महत्वाचे प्रक्षेपण यान असून याची उंची ४३.५ मीटर आहे व वजन ६४० टन आहे. याचे ३ स्तर आहेत. ‘चांद्रयान – ३’ हे  ‘एल व्ही एम’ चे सातवे प्रक्षेपण आहे.

‘चांद्रयान – ३’ मध्ये ‘चांद्रयान – २’ प्रमाणेच लॅन्डर आणि रोव्हर असेल मात्र ऑर्बिटर असणार नाही.

पृष्ठभागावरून डेटा गोळा करण्यासाठी सहा वैज्ञानिक उपकरणे असतील.

Lander

Source: ISRO

लॅन्डर पेलोड:

1) RAMBHA – LP

चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा (आयन्स आणि इलेक्ट्रॉन्स) त्याची घनता आणि त्यातील बदल यांचा अभ्यास.

2) ChaSTE (Chandra’s Surface Thermo-physical Experiment)

चंद्राच्या पृष्ठभागावरील ध्रुवीय भागातील थर्मल प्रॉपर्टीजचे मापन करणे. 

3) ILSA (Instrument for Lunar Seismic Activity)

चंद्राच्या भूमीच्या भुकंपशीलतेचे मापन तसेच चंद्रभूमीची रचना, कवच आणि आवरणाचे वर्णन करणे.

रोव्हर पेलोड:

4) APXS (Alpha Particle X-Ray Spectrometer)

चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यासाच्या दृष्टीने केमिकल कंपोझिशन आणि मिनरलॉजिकल कंपोझिशन यांचे परीक्षण . 

5) LIBS (Laser Induced Breakdown Spectroscope)

चंद्राच्या पृष्ठभागावरील लँडिंग साईटच्या अवती भोवती असणाऱ्या मातीचे तसेच दगडांच्या मूलभूत संरचनेचे परीक्षण आणि निरीक्षण करणे.

Rover

Source: ISRO

प्रोपल्शन मॉड्यूल पेलोड:

6) SHAPE (Spectro-polarimetry of HAbitable Planet Earth)

प्रकाशाच्या ध्रुवीकरणाचे विश्लेषण करून, चुंबकीय क्षेत्र, रचना आणि इतर घटकांसह या वस्तूंच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्वाची माहिती प्राप्त करणे.

चांद्रयान – ३ चे लँडिंग यशस्वी झाले तर अशी मोहीम करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी चंद्र मोहीम राबविली आहे. जर चांद्रयान – ३ हि मोहीम यशस्वी झाली तर भारताच्या अंतराळ संशोधनात एक मानाचा तुरा खोवला जाईल.

अमेरिकेच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ने भारताच्या महत्वाकांक्षी अवकाश कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.

मित्रांनो तुम्हाला जर चांद्रयान – ३ ची माहिती आवडल्यास मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा.